पर्स माझी शोधत होते ....
सहज म्हणुनी मी परवा पर्स उघडली,
सहज म्हणुनी आठवणीनी गर्दी केली,
शोधू म्हणता कायकाय ते सापडू लागले,
शोधता शोधता अश्रू एकाएकी बरसू लागले
सापडला मज तो जुनासा एक रुमाल,
हलकेच मग मी तो लावला डोळा माझ्या
कळले अश्रूंची ओलावा उडाला होता पण,
आसवांचा गंध मात्र टिकून होता...
सापडले मला एक सुकलेले बकुळीचे फुलही
हुंगून पहिले येतो का तो गंध आजही त्याला,
कळले मला कि सुगंध जरी उडाला होता पण,
हळव्या क्षणांचा नाजूकपणा तसाच होता...
सापडले मला काही कागदाचे कपटे हि,
समजेना काय लिहिले होते त्यावरती,
कळले मला शब्द जरी पुसले होते पण,
शब्दातील भावना ओल्या तशाच होत्या,
सापडले असे बरेच काही मला त्या पर्स मधे
तो रुमाल, ते फुल,काही कागदाचे कपटे
सगळे बाजूला टाकून मी वेड्या सारखी
आणखी काही मिळते का ते शोधत होते,
हद्दच झाली माझ्या खुळे पणाची मात्र आता,
हरवून त्याला मी, जुन्या पर्स मधे शोधत होते.
एक थेंब तुझ्यासाठी ..
२० जुलै २०११