Saturday, May 7, 2016

भिजवून कडा चिंब पापण्यांच्या ...


रात्रभर सये आसवांचा पाउस बरसून गेला
आठवणीचा खजिना उगाच हरवून गेला
जाग आली सकाळी त्या धुंद मृदुगंधाने
पेटलेल्या मातीला तसाच भिजवून गेला ......
पेटलेल्या मातीत श्वास थिजलेले
उश्वास काही अबोल मिटलेले
निपचित सारे कलेवर पडलेले
तो पुन्हा मुसळधार बरसून गेला
जाता जाता असा कोसळून का गेला
भिजवून कडा चिंब पापण्यांच्या
खळीत गालावरती टपकून गेला
जपून ठेवला मी माघारी तो
थेंब एक टपोरा मागे ठेवून गेला
एक थेंब तुझ्यासाठी
30 April 2016

Sunday, April 17, 2016

गेला साजण परदेस ,




गेला साजण परदेस

चैन काही पडेना जीवाला , काहिली उरी दाह ग्रीष्माचा ,
वाढविती तृष्णा जीवाची, येता अवचित वळवाच्या धारा,
सांग कशी आवरू स्वतःला …. गेलास का तू परदेस
का गेलास साजणा परदेस

डोहात या काजळ उरले , अश्रू सारे असेच संपले
फुलून आला गंध मोगर्याचा , त्यात कातर तिन्हीसांजा
तोल मी तरी कसा सावरावा …… गेलास का तू परदेस
का गेलास साजणा परदेस


एक थेंब तुझ्यासाठी
17 April 2016

Tuesday, January 26, 2016

थिजलेले कातळ शिल्प दुनियेत मागे उरे .......



भीती तुला प्रीत जडेल ह्याची
भीती मला प्रीती कळेल ह्याची

हुरहूर उगी दाटली ह्या वेड्या मना
अबोला आपल्यातला कळेना कोणा

नसे शब्दांना उच्चार काही  
शांतता का कधी गूढ असते

तीळ तीळ उरात जळतो दिवा प्रीतीचा
पापण्यांच्या पतंगाची फडफड ती दिसते

निशब्ध दोघे आपण,  निश्चल परी खरे
थिजलेले कातळ शिल्प दुनियेत मागे उरे

थिजलेले कातळ शिल्प दुनियेत मागे उरे

 एक थेंब तुझ्यासाठी
२६ जानेवारी २०१६ 

Saturday, November 7, 2015

कोटी कोटी थापा तुझ्या ,कोटी कोटी वादे सारे




कोटी कोटी थापा तुझ्या ,कोटी कोटी वादे सारे
कुठे कुठे शोधू तुला ,भटकतोस जगभर कारे


सोडून देश आपला नेहमी बाहेर तुझा वास
देहबोलीतून येतसे  अहंकारी वास
येत जाता फेकूगिरी, विश्वास ठेवू कसा रे

ध्रु: कोटी कोटी थापा तुझ्या ,कोटी कोटी वादे सारे

कधी होतोस बब्बर शेर, कधी चाय वाला
गप्पा सांगे साबरमती,हा बारामती वाला
रंग बदली सरड्या परी, खरा रंग कोणता रे

ध्रु: कोटी कोटी थापा तुझ्या ,कोटी कोटी वादे सारे


प्याकेज विना दुजा शब्द तुला का मिळेना
खरे रुप कोणते तुझे ह्या पामरा कळेना
देशी परत आणू कसा मार्ग मला मिळेना

ध्रु: कोटी कोटी थापा तुझ्या ,कोटी कोटी वादे सारे

एक थेंब तुझ्यासाठी
७ नोव्हेंबर २०१५

Thursday, September 3, 2015

भावनांचा खेळ बिलोरा


एक एक आठवण ,पापण्यांच्या कडा ओल्या
जाती परतून नयनी , भावनांचा खेळ बिलोरा

अलगद जरी टपकली , खळकन येतो आवाज
काचेच्या आठवणी राहती काचेच्या पेल्यात

हळुवार पणे , नाजूक फुंकर , येतो शहारा
आठवनींचा पसारा नव्हे काचेचा खेळ सारा

हिशोब मांडते कधी मी , फुटलेल्या काचांचा
बोचते एखादी मधेच, जाणीव चुकांची होता

फुटलेल्या परी ,बोचलेल्या अधिक  होत्या
नाजूक तेवढ्या  बाकी खर्च व्हायच्या होत्या

नाजूक तेवढ्या खर्च व्हायच्या होत्या.........

एक थेंब तुझ्यासाठी 

Sunday, August 23, 2015

हीच चिंता त्या शब्दांच्या माथी


विचारांचा घोटला गळा,भावनांचा केला चक्काचूर
विचारतात उरले काय मग , मनाच्या तळाशी आता

तो विचार, ती भावना ह्यांचा बळी घेवून जन्मली कविता

तू चुंबिता ते शब्द कवीचे , झाले जिवंत सगळे पुन्हा
विचार झाले शिरजोर, भावना झाल्या अनावर पुन्हा

देवून जीवन त्यांना तू घेतलास बळी कवितेचा ,


जन्म  की मृत्यू  दोन्ही खेळ ना कोणाच्या हाती
मोक्ष कसा लाभावा, हीच चिंता त्या शब्दांच्या माथी

हीच चिंता त्या शब्दांच्या माथी

एक थेंब तुझ्यासाठी .
23 August 2015 

Sunday, August 16, 2015

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना





सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….

आणलेस का मज सांग ना , ओंजळीतून हे शिंपले
स्वप्नापरी जे रंगले , होऊन मोती किती सांडले
नकाराची तुला मी……  देवू किती कारणे ,
घे की रे समजून साजणा , मन मोहना  मन मोहना .

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….


हैराण मी, व्याकूळ मी , तो स्पर्श का वाटे हवा मला
तनमनात भरलेला गंध वेडा शोधते मी दुराव्यात हि ….
नकाराची तुला मी……  देवू किती कारणे
ओढ हि मनीची  संपेल कशी  सांग ना , सांग ना

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….

ठेवून भाळी अधर तुझे का भरलेस मळवट असे  
शमली माझी क्षुधा , तृपता दाटली मनी माझ्या
नकाराची मला  …सापडूच नये कारणे  आता
उगा लांबलेली भेट हि घेवून मिठीत संपवना संपव आता

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… ….

एक थेंब तुझ्यासाठी
१५ ऑगस्ट २०१५ 

Sunday, March 29, 2015

जीथे होते थीजले निखारे दवाने



जीथे होते थीजले निखारे दवाने
तृषा का भागली फक्त एका थेंबाने

जाळणारा पाउस आला परत जोमाने
रोमरोमातुनी चेतवून गेला निखारे

डुंबले किती तरी वर यावे नव्याने
खोल किती राहावे मनाच्या तळाने

सांडला प्राजक्त अंगणात कशाने
नकळत झालेल्या अबोल स्पर्शाने

एक थेंब तुझ्यासाठी
२९ मार्च २०१५

Sunday, March 8, 2015

परी सौदागिरी येत नाही ......


दुनियेतला मी जरी, परी दुनियेचा चाहता नाही
चालतो या बाजारी जरी,  परी ग्राहक मी नाही

असलो हृदयात जरी, परी वेदना मी नाही
नाद मधुर उठला जरी, परी कंपने माझी नाही

वाटलो बिमार जरी, परी आजारी मी नाही
असलो वैदू किती जरी, परी औषध ठावूक नाही

भाव मला ठावूक जरी, परी व्यापारी मी नाही
सौद्याचे कळले मोल जरी, परी सौदागिरी येत नाही
एक तेवढी परी सौदागिरी येत नाही

एक थेंब तुझ्यासाठी
८ मार्च २०१५

Tuesday, March 3, 2015

ओढून धुक्याची दुलई


ओढून धुक्याची दुलई आले मी बेभान इथवर 
कळले न मला नजरेतुनी तुझ्या पोचले कुठवर 
दुलईत धुक्याच्या राहूदेत लपेटूनी मजला 
पहाटेच्या गुलाबी थंडीत मिठीत तुझ्या साजणा 
कायमची निजुदेना मला ………………

सावर ग सये तुझ्या उनाड बटा ,



हाय रोज वेग वेगळ्या छटा ,
सावर ग सये तुझ्या उनाड बटा ,

काळजाच्या जखमांनी दिली वर्दी
पौर्णिमेच्या चांदण्यांचा घाव वर्मी

ऋतूही आताशा लागले बघ छळू
ऐन वसंतात बहर लागला गळू

कल्लोळ भावनांचे  उमटू लागले
मंदिरातले दिवे विझू लागले

इर्षेत भ्रमर सारे बघ जळू लागले
ऐकून कहाणी सारे पळू लागले

हर एक दिवस , हर एक अदा
सावर ग सये तुझ्या उनाड बटा

एक थेंब तुझ्यासाठी
०३ मार्च  २०१५

मोरपंखी स्वप्न तिचे , पुन्हा एकवार

 मोठ्या धीराची होती ती एक नाजूक परी  नियतीने तिला भरडले घालून जात्यापरी  शोधीत होती , भरकटलेल्या वादळात  मिळेल का मला एक हळवे बेट  प्रश्नांच...