Thursday, May 19, 2011

ते फक्त फसफसू शकते उसळी नाही मारत...

विकास दर गाठायचा कि वाढत्या महागाईला तोंड द्यायचे याच विवंचनेत बहुतांश भारतीय समाज आता अडकला आहे. मुक्त भांडवलशाही कितीही वाचायला गोड वाटत असली तरी तिची मुळे हि कडूच असतात हे वास्तव आता हळू हळू का होईना आपण लक्षात घ्यायला हवे. अमेरिकेत झाले म्हणजे आपल्या कडेही तसेच होवू शकते एवढा भाबडा आशावाद बाळगून आपण जोमाने वाटचाल करत आहोत.
परंतु मुळात अमेरिका हा देशाच उपऱ्यांचा...आणि स्वतहाची अशी काही ओळख नसलेल्या एका कळपाचा आहे. त्यात निरनिराळ्या पद्धतीची लोके आहेत. पण त्यांची एक म्हणावी अशी  कुठलीच संस्कृती नाही. जे मिळेल ते घेत गेले जे नको ते टाकून दिले अशा काहीशा विचारसरणीवर वाढलेली सारी जमात आहे. भांडवलशाही तिथे यशस्वी झाली, पण म्हणून हा नियम प्रत्येक समाजाला लागू होईल असे नाही...
विकास दराचे टोक गाठताना ..महागाईची झळ आज बसू लागली आहे आणि इथेच खरी गोम आहे.  कोण म्हणेल कि बरोबरच आहे थोडे चटके सोसल्या शिवाय चांगले दिवस कसे दिसणार? अर्थात बहीण बाईंचे विचार इथे लागू होत नाहीत कि...आधी हाताला चटके तवा मिळते भाकर....

किंबहुना आधी विकासाचे मटके त्यात महागाईचे निखारे फार अशीच काहीशी अवस्था आहे. जागोजागी उभे राहिलेले मॉल आणि लागलेच्या छानचोकीच्या सवयी...त्यात स्वतःहून बदलून घेतलेली  जीवन शैली. ह्या सगळ्यात महागाईचे चटके सोसायचे म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार असेच झाले आहे...

सरकार काही करत नाही...अशी बोंब सगळेच मारतात (अहो इकडे अमेरिकेत सुद्धा ) पण सरकारने करावे काय असे राहिले आहे हातात? 
जे जे म्हणून आपण आपले उभे केले होते ते सगळे , भांडवलशाहीच्या नादाला लागून आपण विकून बसलो किंवा विकत आहोत. माझी आजी म्हणत असे..अरे जेन्ह्वा घराचे सोने विकून तू श्रीमंत होशील तेन्ह्वा सगळ्यात दरिद्री तूच आहेस असे समज.  
रोज रोज पेपरातून येणाऱ्या सरकारी विनिवेशाच्या जाहिराती पाहून आणि त्या वरील तज्ञांचे विचार वाचून खरच विषाद वाटतो.  सरकारचे काम वस्तू बनवणे नाही तर वस्तू बनवायला उत्तेजन देणे आहे..म्हणून आम्ही सरकारी उपक्रमांचे हळू हळू खाजगीकरण करत आहोत..जेणे करून त्यात एक व्यावसायिकता यावी आणि जास्तीतजास्त फायदा मिळावा.

मग हेच विनिवेशातून पुढे आलेले भांडवलदार कशी लयलूट करतात आणि जागतिक मंदीचे कारण ठरतात हे आपण आताच येवून गेलेय मंदीतून पहिले आहे. या वेळेची मंदी सर्वार्थाने  वेगळीच ठरली..विकासाची मडके हातात घेवून उभे असलेल्या भारताला (चुकलो इंडियाला) त्या मडक्यात काय काय असू शकेल ह्याची एक झलक दाखवून दिली. ज्या अमेरिकेचे भांडवलशाही धोरण आज आपण स्वीकारले आहे , किंबहुना अंगिकारले आहे. अशा अमेरिकेतच हे भांडवलदार सरकारकडे तिथल्या जनतेच्या घामातून जमवलेल्या पैशांच्या जीवावर आपले घाणेरडे कपडे धूत होते. अर्थात त्याला भांडवलशाहीने खूप चांगले नाव दिले होते..बेल आउट प्याकेज. स्वाती पैसे कोणाचे गेले तिथल्य सामान्य जनतेचे फक्त सरकारी तिजोरीतून गेले एवढेच. 
दूर तिकडे युरोपात सुद्धा हाच फाजील पणा चालू आहे , युरो च्या नावाने एकत्र आलेल्या भांडवली ठेकेदारांना आता समस्या जाणवते आहे ती , मी तुझी धुणी का धुवावी ह्याची. एकीकडे ग्रीस , पोर्तुगाल ह्या सगळ्या तथाकथित भांडवलदारांच्या हातातील व्यवस्था आता अक्षरशः घायाळ झाल्या आहेत. समस्या तीच आहे ...महागाई 

मग आजच हे सगळे लिहिण्याचे उपयोजन काय? कारण इतकेच...कि आजूनही इंडिया मध्ये भारत वेगळाच आहे. ज्या देशात मुलभूत परिस्थिती अशी कि जिथे उपासमारीने आजही शेतकरी मारत आहेत त्याच देशात विकास २ अंकी होतो म्हणून सगळे मोठ्ठ्या खुशीत आहेत.

काहीतरी चुकले आहे....दोष भांडवलशाहीचा नाही..आपलाच आहे. पोट दुखत असताना ..डोके दुखायची गोळी घेवून कसे चालेल??? वेदना शमन जरी दोन्ही गोळ्यातला समान धागा असलातरी त्यांचे कार्य वेगवेगळ्या भागावर चालते हेच आपण विसरलो आहोत. मी इथे कम्युनिझम चा प्रचार किंवा भांडवलशाहीचा विरोध करत नाहीये.

सांगण्याचा अर्थ एवढाच आहे कि ज्या वेळेला जगाला मोठ्या आर्थिक मंदीने पूर्वी ग्रासले होते तेन्ह्वा (औद्योगिक मंदी जी आपण शाळेत शिकलो होतो बहुधा) केंन्स नावाचा कोणी अर्थ शास्त्रज्ञ होवून गेला ज्याने लिहिलेल्या अर्थविषयक प्रबंधामुळे जगाला त्या औद्योगिक मंदीतून बाहेर यायची वाट सापडली म्हणे....त्या वाटेलाच आजची भांडवलशाही असे म्हणतात...

पण एक सांगू का....त्या वाटेवरही खच खळगे आहेतच कि...आणि सध्याचा खड्डा ज्यात तुम्ही आम्ही सगळेच उभे आहोत ...तो इतका मोत्ठ्ठा झाला आहे ना कि...त्यातून बाहेर कसे पडावे तेच सुचत नाहीये...

बघुयात पुढचा केंन्स कोण जन्माला घालतो ते....

सध्यातरी कोकाकोला प्यायची वेळ झाली आहे....त्या मुळे थांबतो.....एवढे मात्र नक्की कि तो केंन्स का कोणी इन्दिअत जन्माला येणार नाही....कारण आमच्या रक्तात आता कोकाकोला वाहते ...ते फक्त 
फसफसू शकते उसळी नाही मारत...

एक थेंब तुझ्यासाठी 




No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...