Sunday, July 17, 2016

काय सांगू , कळेना मला .......





काय सांगू , कळेना मला .......


बदलली आहे हवा आज जरा ...
उडती आज बटा भूर भूर जरा  
रंग फुलांचे भासती नवे मला
विचारले कोणी काही मला

काय सांगू , कळेना मला .......

का ग कोकीळ गातो असा वेडा
आला श्रावण तरी का हा खुळा
येतो कुठून हा आर्त-स्वर आगळा
विचारले कोणी काही मला

काय सांगू , कळेना मला .......


एक थेंब तुझ्यासाठी
१७ जुलै २०१६



Saturday, July 9, 2016

आठवते मज सारे , पडता पाऊस चोहीकडे




आठवते मज सारे , पडता पाऊस चोहीकडे

तशातच..

ते उठलेले वादळ, तो सुटलेला वारा,
ते दाटलेले काळे ढग, तो निसर्गाचा इशारा,
आठवणी ह्या मजपाशी...

तशातच....
कडाडणारी वीज, कोसळणारा पाऊस,
कुंदधुंध हि हवा, ओले ओले कासावीस मन
आठवणी ह्या साऱ्या मजपाशी...

तशातच...
तुला झालेला पहिला स्पर्श, तू घेतलेले ते चुंबन,
मोहरलेले ते यौवन, उठलेले ते रोमांच
आठवणी ह्या साऱ्या मजपाशी....

कोरड्या मनाला, समजावीत उभी मी उंबर्याशी..
सांगू कुणा आता साऱ्या, गेला साजण दूरदेशी
गेला साजण दूरदेशी..

एक थेंब तुझ्यासाठी

Monday, July 4, 2016

मन अवसेची वाट पाहू लागले





मन अवसेची वाट पाहू लागले

जवळ यावे कितीदा ठरले तरी
अंतर दोघातले वाढतच आहे
एक एक क्षण लांबतो दिवसापरी
दिवस ,आयुष्यपरी वाढत आहे

पेरली मातीत तुझी आठवण
सुगंधी सडा सदाच माझ्या दारी
बहरली अंगणी प्राजक्त बनुनी
सजली कधी  होऊन रातराणी

पौर्णिमेचे शुभ्र चांदणे सांडले
काही कवडसे मुठीत झाकले
वाटे पाहावे काही मग त्यातले
मन अवसेची वाट पाहू लागले

एक थेंब तुझ्यासाठी
४ जुलै २०१६ 

Saturday, July 2, 2016

चिंब चिंब भिजताना ....



चिंब चिंब भिजताना ....

ओले ओले चिंब कपडे, ओले चिंब मन होत होते
ओले होते स्वप्न सारे , ओल्या ओल्या पावसातले

ओल्या  हातात माझ्या तुझा ओला हात होता
ओल्या हातावर नाव ओलेचिंब करून गेला होता

ओल्या तनुवर् ओघळलेला तो थेंबही ओला होता
ओल्या  मिठीतून  सुटलेला तो ओला क्षण होता


ओल्या होत्या आठवणीं , वेळच तशी ओली होती
ओला होता क्षण एक वेडा , ओल्या  पावसातला

एक थेंब तुझ्यासाठी
02 July 2016

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...