ती तशी नेहमीच दमून भागून घरी येते.. घर संसार, मुले बाळे, त्यांचे शिक्षण, नवरोजी (म्हणजे मी हो) चे मन जपणे, सासू सासरे, नातेवाईक सगळ्यांना पुरून उरते... कधी म्हणून कंटाळा दिसत नाही तिच्या चेहऱ्यावर. कधी कधी थोडीशी चिडते, पण शेवटी माझाच संसार आहे म्हणून गप्प बसून सगळे सहन करते. तिची नोकरीही तशी चांगली आणि उत्तम संधी असलेली. बिच्चारी उन्नतीचा विचार न करताच संसारासाठी झटत असते. प्रमोशन घेतल तर घराकडे, मुलांकडे लक्ष देता येणार नाही. धन्य आहे बाबा तिची...माझे तसे नाही...मी अजूनही तसाच २ पोरांचा बाप होवून पण तो तसाच कौलेज मध्ये होतो तसाच...जराही गांभीर्य नाही कि जगण्याचा दृष्टीकोन अजून सापडलेला नाही. आला दिवस मस्त मजेत धमाल करण्यात घालवायचा.
तिला प्रपोज करून लग्न केले त्याला सुद्धा आता बरीच वर्षे झालीत. ती मात्र हळू हळू का होईना पण बरीच बदलली आहे. आता त्या कॉलेज कुमारीची काकू झाली आहे. दरवेळेस आपले संसार घर, हेच तिच्या डोक्यात असते. मला नाही हो जमत असले भातुकली खेळ ! चायला मस्त आठवडा भर काम करावे, आठवड्याचा शेवट गोड करावा.... दोन घोट घेवून घसा ओला करावा आणि मग मस्त पैकी कोंबडीवर ताव मारावा. पण हिचे आपले चालूच...या रविवारी सत्यनारायणाची पूजा घालुयात या वर्ष भरात झालीच नाहीये. तर कधी म्हणे गावी एक चक्कर मारून येवूयात, का तर मजा करायला नाही, तर म्हणे तिकडे थोडे काम बाकी आहे, घराकडे पण लक्ष देणे जरुरी आहे. तर कधी म्हणे छोट्याची परीक्षा आहे तर कधी मोठीचे प्रोजेक्ट आहेत. या सगळ्या राम रगाड्यात माझी पण दृष्टी कुठेतरी हरवत चालली आहे. पूर्वी केवढा रोमांटीक का काय म्हणायचे तसा होतो मी. हल्ली आठवडे कसे जातात ते कळत नाही. रोमान्स कसला डोम्बल करणार. खरा सांगू का सुचतच नाही हल्ली काही. संध्याकाळी घरी जाताना फुले घेवून जावू म्हटले तर वाटते जावूदेत चायला सकाळ पासून उन्हात उभे राहून ती फुले पण कंटाळली असतील कुठे त्यांना आता कामाला लावा. काही गिफ्ट घेवून जावे म्हटले तर खर सांगू का सगळे आहे घरी, काय देवू तेच तेच पुन्हा असे वाटते. मुळात काय ना ह्या डोंबिवली च्या एकसुरी आयुष्याने अगदी विचका केलाय. सकाळी लवकर उठा पाणी भरा, धडपडत ती गाडी गाठा, संध्याकाळी घरी आले कि अगदी राम राज्यात आल्या सारखे वाटते. राम राज्य मला वाटते फक्त डोंबिवली मधेच अनुभवायला मिळेल...संध्याकाळचे दिवे गेलेले सगळे लोक अगदी नेहमीच्या सवयी प्रमाणे मेणबत्या किंवा मिण मिण दिवे लावून काम करणारे. चायला हॉटेल मध्ये जावून कॅन्डेल लाइट डिनर घ्यायचे देखील सुख आमच्या कडून हिरावून घेतले आहे. आमचा आपला आठवड्यातून ४ दिवस ठरलेला कॅन्डेल लाइट डिनर असतो. एवढ्या सगळ्या गदारोळात ती रोमांटीक दृष्टीच कुठेतरी हरवून बसल्या सारखे झाले...
तो दिवस तसा नेहमी प्रमाणेच उजाडला, सकाळी सकाळी मी अंघोळ करून ऑफिस ला जायच्या तयारीत आवरू लागलो. सवयी प्रमाणे स्वयंपाक घरात डबा घेण्यासाठी गेलो...आमच्या डोंबिवली मध्ये ना साला ए सी लावला असला तरी घामाच्या धारा वाहात असतात. डोंबिवलीच्या हवेची मजाच काही और आहे. असो......तर काय सांगत होतो...
हि आपली घाम घूम होवून पोळ्या लाटत होती, नख शिखांत घामाने डब डबलेली, मी तिला पहिले आणि आणि आणि....वेडाच झालो...म्हटले टू केवढी सुंदर दिसतेस ...ती जरा खेकसूनच म्हणाली वेळ काळ नाहीये का ...वाजले किती बघा...आज जरा उठायला उशीर झाला तर डब्याला पण थोडा उशीरच होतोय. देते एक मिनिटात घ्या आणि निघा गाडी जाईल नाहीतर.
माझ्या मनात मात्र भलतेच...मी म्हटले अग पहा जरा स्वतः कडे, केस जरी विस्कटले असले तरी पोळीचे पीठ त्या बटेला लागून काय सुंदर दिसत आहे.... तुझ्या मानेवरून ओघळणारे ते घामाचे थेंब , तुला हळू हळू भिजवत आहेत...तुझ्या देहाची पोळ्या करताना होणारी मनमोहक हालचालच मला आज वेडे करून जात आहे..आईकून ती हबकलीच जागच्या जागी..... मोठ्ठा आ वासून बघत उभी राहिली .......मी हातातली ब्रीफकेस फेकली जमिनीवर आणि तिला तशीच जवळ ओढली....काय मस्त सीन होता सांगू...ती अशी घामाने भिजलेली , मी असा कडक इस्त्रीतल्या कपड्यातला, तिच्या एका हातात लाटणे तर माझ्या एक हातात तिचे मानेवरचे केस.....त्या चिंब चिंब घामाने भिजलेल्या तिच्या मानेवरून मी माझे ओठ फिरवले आणि ते घामाचे थेंब टिपून घेतले........
कधीकाळी कोलेजात असताना एका छताखाली उभे राहायचो पावसाळ्यात, तेन्ह्वा तुझ्या अंगावर उडालेले थेंब असेच मी टिपून घेत असे....आठवते का काही मी म्हणालो.
आजचे थेंब मात्र वेगळेच होते....घामाचे थेंब.....थोडे नाही चांगलेच खारट....ती पटकन म्हणाली सोडा ना काय करताय....घाम कसला टिपताय ..काहीतरीच तुमचे...... घाणेरडे कुठले काही वाटत नाही का....मी तिला लगच म्हणालो अग ह्या घामाच्या थेंब मधला आणि त्या पावसाच्या थेंब मधला फरक सांगू का तुला ?ते प्रेम अधीर होते आजचे प्रेम मुरलेले आहे इतक्या वर्षाच्या संसाराने ते कमी नाही झाले उलटे वाढलेलेच आहे... त्यावेळी पावसाच्य पाण्याला तुझ्या देहावरून टिपून घेताना ते गोड वाटायचे ... आता ह्या मे महिन्याच्यादिवसात सुद्द्धा तुझ्या अंगावरून ओघळणार्या घामाच्या थेंबाची चव काही न्यारीच आहे.....थोडीशी खारट पण हवी हवीशी आहे.
म्हणूनच तर आपले गुलझार साहेब म्हणतात ना....
जुबान पे लागा लागा रे नमक इश्क का हाय रे नमक इश्क का....तेरे इश्क का
आता कुठे कळले आम्हाला गुलझार साहेबांचे इश्क़ वाले नामक काही वेगळेच आहे....प्रत्येकाने ते एकदा तरी आजमावून बघावे असेच आहे. नाहीतर आम्ही आपले ह्या गाण्य वर सदर झालेल्या नृत्य वरूनच त्याची परीक्षा केली होती...
काय लिहिले आहे अश्लील गुलझार साहेबांनी असे वाटले होते....आणि त्यात ती बिपाशा नाचली होती...सगळाच आपला डोळ्यांनी बघू नये आणि कानांनी आईकू नये असा प्रकार वाटायचा .
पण खर सांगू का आमच्या घरातल्या त्या छोट्याश्या सीन नंतर मला मनोमन पटले गुलझार साहेब काय म्हणतात ते . बघण्याचा दृष्टीकोन बदला सगळे जगच तुम्हाला वेगळे भासू लागेल असे कुठेतरी वाचले होते.
गुलझार साहेब धन्यवाद ....आमच्या छोट्याश्या संसार मधल्या ह्या हलक्याफुलक्या प्रेमाला सुद्धा तुम्ही किती उंचीवर नेवून ठेवलेत...
एक थेंब तुझ्यासाठी - महेश उकिडवे
1 comment:
Superb. I have no words to say or write.
Post a Comment