Wednesday, May 18, 2011

हल्ली माझ्या शर्टाला खिसाच नसतो.......


ते दिवसच काही और होते, कित्ती वेळा त्याच त्याच रस्त्याने जायचे,त्याच त्याच खिडकीत बघत बसायचे.वाटायचे कधीतरी दर्शन होईल. कधीतरी तो एक कटाक्ष मलापण मिळेल. त्या वेड्या आशेवर जगण्यात अर्धे काय अहो जवळ जवळ पूर्ण महाविद्यालयीन वय निघून गेले. आठवणीच त्या कधीतरी उफाळून येणारच, मग आल्या कि अशा काही येतील कि बरसून जावा पाऊस, अगदी हवा हवासा वाटताना. नकळत मग मन हळू हळू मागे जाते...ते दिवस त्या गमती जमती आठवल्या कि कसे का कोणास ठावूक थोडे ओले होते. मग त्या ओल्या मनाची स्पंदने तीही हळूहळू ओलीच भासू लागतात , अलगद पणे एक एक करत ती सुरेल झंकार छेडीत जातात. बघा आठवते आहे का ती चोरटी नजरा नजर, बघायचे असून देखील न बघण्या सारखे करायची धडपड. त्या चोरट्या नजरेतच साली जाम मजा होती. काय कळणार ह्या वेड्यांना जे ढोसत बसतात हल्ली कि नशा त्या दिवसातली काही न्यारीच होती. ती धडपड तिच्या आधी जावून तिच्या गल्लीत उभे रहायची....चायला कित्ती लेक्चर्स त्या पायी अर्धी टाकून पळालो आहे कोणास ठावूक? ती आलीच नाही किंवा दिसलीच नाही कि मग वाटायचे मास्तर बरा शिकवत होता उगाच पळालो. पण ती दिसली कि वाटायचे आयला हि अशीच दिसत राहणार असेल ना तर जन्म भर ह्या लेक्चर्स ना बसणार नाही. मग काय ती तिच्या सोसायटी मध्ये शिरे पर्यंत आमची तिथेच समाधी लागायची. वाटते सांगावे ह्या सगळ्या, बाबा, योगी, तपस्वी आणि कोण कोण काय ते त्यांना कि बघा अशी समाधी लावलीत ना कि मोक्ष सुद्धा अगदी चटकन मिळतो.....कशाला उगाच आपले ते नसते योग प्रकार आणि धार्मिक कामे करा. असो......विषय भरकटून देता कामा नये... मग हळू हळू तिचा आणि माझा धीर चेपू लागला. मला वाटू लागले कि तिला बहुतेक माझे उभे राहणे आवडत असावे. तिला वाटत असेल बरा उभा आहे रोज रोज, कोणी आले गेले ना गल्लीत कि त्यालाच पत्ता विचारतात (ह हा हा ). लाल शर्ट घातला कि अगदी पोस्टाची पेटी वाटतो. हळू हळू चेपणार्या धीराची जागा आता, एका अनामिक ओढीने घेतली होती. का कोणास ठावूक पण ती दिसली नाही किंवा तिला तो कधी दिसला नाही तर काहीतरी चूक चुकल्या सारखे वाटू लागले होते. हळू हळू वर्षे सरत होती...धीर चेपला होता तरी विचारण्याचा धीर कोणासच झाला नव्हता. नाही होत हो असा धीर. आ धीर व्हायला मी काय कोणी अमिताभ कि दिलीप कुमार? मग काय  तेच तेच उभे राहणे आणि तसेच आपले काळाने पुढे जाणे चालूच राहिले.

यथावकाश मोठ्ठा का काय म्हणतात ते झालो. मोठ्या गाढवाला बहुतेक समंजस किंवा माय्चुअर  का काय म्हणत असावेत...भल्या मोठ्या पगाराची नोकरी....कोरी करकरीत गाडी....ह्म्म्म गाड्या.. सारी भौतिक सुखे पायाशी लोळण घेवू लागली....

बर्याच  दिवसांनी जन्मगावी / आता शहर म्हणतात त्याला आलो होतो. ते सुद्धा सोडून आता कित्ती वर्षे झाली होती. सगळे काही नवीन  आणि वेगळे वाटणारे.तसे म्हणायला कोणी ओळखीचे दिसलेच नाही.
बायको बरोबर गाडीतून जात असताना आरेच्या ती गल्ली दोघानाही एकदम ओळखीची वाटली....आरे इथे काहीतरी राहून गेले आहे असे वाटले...

मी हळूच तिला म्हटले ...

तुम्हारी गली की उन मस्त मस्त नज़रों ने चुराया होगा....

मुझे यक़ीन है कि तुम्ही ने उन्हें बताया होगा....

उस दिन से मेरे कुर्तेसे  बायीं जेब गायब है....

क्या पता कहीं जेब से दिलही  ग़ायब है.....


खरच सांगतो अहो बघा वाटले तर, हल्ली माझ्या शर्टाला खिसाच  नसतो.......




महेश उकिडवे

No comments:

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...